कृषि पणन मंडळाचा ‘संत्रा महोत्सव’ पुण्यात होणार सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
सन २००३ पासून सुरू असलेल्या पणन मंडळाच्या आंबा महोत्सवास तसेच मागील वर्षी पासून सुरू करण्यात आलेल्या मिलेट महोत्सवास पुणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मिलेट महोत्सवामध्ये प्रायोगित तत्वावर काही संत्रा उत्पादकही सहभागी झाले होते व त्यांच्याकडील संत्रा खरेदीलाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.
सदर महोत्सवांची व्याप्ती वाढवावी व शेतमाल उत्पादकांना जास्तीत जास्त विक्रीचे विविध पर्याय उपलब्ध करून देणेबाबत राज्याचे पणन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ मा.ना.श्री.जयकुमार रावल यांनी सूचित केलेले होते. यास अनुसरूनच चालू वर्षी कृषि पणन मंडळामार्फत ‘संत्रा महोत्सव -२०२५’चे आयोजन गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे करण्यात येणार आहे.
संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया हि पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन यावेळेस सुमारे 50 संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. सदर उत्पादकांना पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे 25 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे.
सदर महोत्सव दि.२० ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत चालू असणार आहे. तरी विदर्भातील उच्च प्रतिच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, श्री. संजय कदम यांनी केले.
Comments
Post a Comment